विजय केशव प्रधान (भाऊ)    
 

जन्म : जानेवारी १९४४            निधन : मे २००९

जन्मस्थळ : दाहोद (गुजराथ)

शिक्षण : नूतन मराठी शाळा (मराठी माध्यम), दाहोद, गुजराथ

पंडया हायस्कूल (गुजराथी माध्यम), दाहोद, गुजराथ

दाहोद येथे शिकत असतानाच भाऊंना 'सिव्हिअर ट्रोमॅटिक आर्थरायटीस' या दुर्धर आजाराने ग्रासले. पण तेथे या आजाराचे निदान होऊ शकले नाही व चुकीचे उपचार केले गेले.

त्यानंतर वडिलांच्या रेल्वेतील नोकरीमुळे प्रधान कुटुंबीय दाहोदहून अजमेर (राजस्थान) येथे गेले. त्या ठिकाणी भाऊंच्या आजाराचे खरे निदान झाले परंतु खूप उशीर झाला होता. भाऊंचे दोन्ही पाय कायमचे निकामी झाले होते. नंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या जगजीवनराम रुग्णालयातही तेरा महिने रहावे लागले.

या अपंगत्वामुळेच त्यांना इयत्ता सातवीनंतर शिक्षणही सोडावे लागले. भाऊंना मराठी, गुजराथी आणि हिंदी भाषा अस्खलितपणे येत असत. प्रदीर्घ आजारपणाच्या काळात रुग्णालयात असताना आणि नंतरही घरी उपचार घेत असताना भाऊंना वाचनाचा छंद जडला. तो पुढे आयुष्यभर राहिला. शिक्षण अपूर्ण राहिले तरीही वाचनामुळे भाऊंचे ज्ञान अफाट होते.

वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रधान कुटुंब डोंबिवली येथे वास्तव्यास आले. एव्हाना भाऊंनी आपले अपंगत्व उघडया डोळयांनी स्विकारले होते. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी येथे असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांमधील उपचारांनी भाऊंचे दुखणे खूप प्रमाणात कमी झाले आणि त्यांनी निर्धाराने आपली आत्मनिर्भर वाटचाल सुरू केली.

आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता भाऊंनी अनेक उद्योग-व्यवसाय केले. ते टायपिंगची कामे करीत असत. हिंदुस्थान मिलच्या कापडांच्या विक्रीचा घरगुती व्यवसाय करीत असत. दिवाळीत आकाशकंदिलही तयार करून विकत. नंतरच्या काळात त्यांनी 'विद्यार्थीमित्र' या नांवाने एक छोटेसे स्टेशनरी विक्रीचे दुकान सुरू केले आणि 'नुक्कड' या नांवाने टेलिफोन बूथही चालविला. भाऊंच्या माणसे जोडण्याच्या कलेमुळे त्यांचे दुकान म्हणजे मित्रमंडळींचा गप्पांचा अड्डा असे आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांचे प्रेरणास्थानही असे.

डोंबिवलीत भाऊ शिवसेनेच्या परिवारात सहभागी झाले आणि त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू केले. १९७९ मध्ये शिवसेना डोंबिवली शाखेच्या शैक्षणिक विभागाच्या वतीने 'स्वातंत्र्यवीर सावरकर बालवाचनालय' भाऊंनी सुरू केले. शालांत परीक्षा मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली.

१९८१ मध्ये मुंबईच्या 'अपंग मैत्री' या संस्थेच्या बरोबर भाऊंनी काश्मिर सहल केली. या सहलीने त्यांना प्रवासाचा आत्मविश्वास दिला. त्यांचा हा आत्मविश्वास इतका की, १९८६ मध्ये  आपल्या तिचाकीवरून ५३ दिवसांचा डोंबिवली ते दिल्ली असा खडतर प्रवास भाऊंनी केला.

१९९६ मध्ये 'भरारी' अस्थिव्यंग विकलांग संस्थेची स्थापना आपल्या सहकारी अपंगांसह त्यांनी केली.

शिवसेनेने चालविलेल्या शिवशक्ती बलसंवर्धन शिबीराचे आयोजन करण्यातही भाऊंचा वाटा मोलाचा होता.

जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळेच भाऊंनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्य केले. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता आणि हे सारे मित्र त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिले.

भाऊंना कवितांची आणि हिंदी सिनेसंगीताची मनस्वी आवड होती. त्यांचे बंधू श्री.अजित प्रधान यांनी हिंदी सिनेसंगीतामध्ये केलेले संशोधन, लेखन यामागील प्रेरणा भाऊंचीच होती.

अखेरच्या दोन-अडीच वर्षात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. पण त्यांची जीवनासक्ती, धैर्य आणि आनंदी वृत्ती कधीच कमी झाली नाही. त्यांच्या याच आठवणी सर्वांना सदैव प्रेरणा देत राहतील.

 

  पहिल्या पानावर